Pune Metro : पुणेकरांसाठी सोमवारपासून मेट्रो सुरु; अशी असेल सुविधा, तिकीट किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत.  पंतप्रधान मोदी उद्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत.  मोदींच्या हस्ते उद्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.  त्यातील एक मार्ग आहे वनाझ ते रामवाडी या दरम्यानचा आहे.  हा मार्ग 13 किलोमीटरचा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे, त्याचे उद्या उद्घाटन होत आहे.  तर दुसरा मार्ग आहे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट. हा मार्ग 12 किलोमीटरचा असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे. उद्या मोदी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचेही उद्घाटन करणार आहेत.
सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार

नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दोन मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.  सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.  पुण्यात वनाझ ते रामवाडी दरम्यान पाच मेट्रो स्टेशनचे उद्घाटन होणार आहे. मेट्रोने प्रवास करताना पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये मोजावे लागतील तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये मोजावे लागतील. म्हणजे वनाझच्या पहिल्या स्टेशनपासून गरवारेच्या पाचव्या स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागतील. 

दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या असणार 

पिंपरी- ते फुगेवाडी या सात किलोमीटरच्या मार्गासाठी देखील वीस रुपये तिकीट असेल. सध्या या दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या असणार आहेत आणि प्रत्येक डब्यात 325 प्रवाश्यांना प्रवास करण्याची क्षमता असणार आहे.  तीन डब्यांमधील एक डबा महिलांसाठी राखीव पोलीस असणार आहे.

शरद पवार यांनी लगावला टोला 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या उद्घाटन कार्यक्रमावरुन टोला लगावला आहे. मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान उद्या पुण्यात येत आहेत असं पवारांनी म्हटलं आहे. पुणे महापालिकेनं उभारलेल्या सुभद्राबाई बराटे रुग्णालयाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना पवारांनी पंतप्रधानांच्या उद्याच्या दौऱ्यावर भाष्य केलं. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या नदी सुधार प्रकल्पावरही त्यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. त्यात काही त्रुटी असतील तर पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर सरकार आणि महापालिकेशी बोलू असं पवार म्हणाले.

Previous Post Next Post