This is a div element with a box-shadow
-->

marathi goshti | मराठी गोष्टी

माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे marathi goshti (मराठी गोष्टी) कशा आहेत नक्की वाचा 


1 ) प्रामाणिक मुलगा 

एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. 

             मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.''


तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्‍यास त्‍याचा दोष आईवडीलांना येतो.


2  लोभाची शिक्षा 

एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस

तात्‍पर्य – लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे.(3 )   खरा वेडा कोण 

एका वेड्यांच्‍या हॉस्पिटलमध्‍ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्‍हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्‍यासाठी अनेक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांना तोंड द्यावे लागत असे. त्‍यातील शेवटच्‍या चाचणीमध्‍ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्‍नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्‍यातील फक्त एकच गोष्‍ट त्‍याला उचलण्‍यास सांगितली जाई. वेड्याने पन्‍नास रूपये उचचले की त्‍याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्‍यास त्‍याला पुन्‍हा एकदा चाचण्‍या पार करायला सांगितल्‍या जात. गरज पडल्‍यास पुन्‍हा उपचारासाठीही पाठविले जाई. 

                हॉस्‍पीटलमधील एक वेडा शेवटच्‍या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्‍या पटापट पार करत असे मात्र शेवटच्‍या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्‍यावर चाचणी घेणारे डॉक्‍टर कंटाळले व त्‍यांनी एक युक्ती केली पुढच्‍या वेळेला त्‍या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्‍नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्‍या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्‍टर आश्‍चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्‍या आरामात पार करतोस आणि शेवटच्‍या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्‍नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्‍हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्‍टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्‍वत:लाच करावा लागणार आहे. त्‍यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्‍नास रूपयांची नोट उचलून स्‍वत:च्‍या पायावर धोंडा पाडून का म्‍हणून घेऊ''4)    एकीचे बळ 

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्‍याने खड्ड्यात पडलेल्‍या जंगली कुत्र्याच्‍या पिलाचा जीव वाचवला तेव्‍हापासून त्‍याला त्‍या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्‍याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्‍याच्‍याजवळ येत असत. परंतु त्‍यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्‍त करून सोडले होते. तो रोज त्‍यांच्‍यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्‍या माथ्‍यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्‍याच्‍यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्‍या कुत्र्याच्‍या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्‍याच्‍यावर धाव घेतली व त्‍याच्‍यावर हल्‍ला करून त्‍याला ठार केले.

तात्‍पर्य :- एकीचे बळ मोठे असते.


5)  बुद्धी ही सर्वश्रेष्ठ 

दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.

              त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.

तात्पर्य-बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.


6) शिकारी आणि कबुतर 
एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने  दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली.

                 त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.

तात्पर्य - माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.

~ शिकारी आणि कबुतर - मराठी गोष्टी

7) मासा आणि हंस 

एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात.

             कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला. त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते. 

तात्पर्य- मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.

~ मासा आणि हंस - मराठी गोष्टी