This is a div element with a box-shadow
-->

राजकारण आणि पक्ष यांचे आम्ही गुलाम

आजा-आजीने हाता-पायाचे तुकडे पडेपर्यंत प्रचंड कष्ट करून घेतलेली, कसलेली माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो.

तलाठ्यांनी सांगितलं-
काम करू पण देणार किती ?
मला वाटलं शेती आमची, बाप माझा, आजा माझा.
मग याला का पैसे द्यायचे ?

तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.
पोलीस म्हटले - गुन्हा दाखल करू, तपास करू पण आमच्या चहा पाण्याचं काय ?

मला पुन्हा राग आला.
यांना तर सरकार म्हणजे मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.

म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,
आमदार म्हटले त्याची गडचिरोलीला बदली करू, त्याला निलंबित करू.
मंत्र्यांना भेटू पण वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं ढकलत नाही.

मला वाईट वाटलं.
यांना तर मी मतदान केलं होतं.

वाटलं कोर्टात जाऊ, 
गेलो.
तिथं गेल्यावर कळलं की तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली होती. 

तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता त्या मॅटरची तारीख होती.
अजून निकाल लागला न्हवता.
शिवाय निकाल ही कसा लागेल याची खात्री न्हवती. 

म्हटलं हे एखाद्या पत्रकार, लेखक, कवीला सांगावं...
मन हलकं करावं. आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.

तिकडे गेलोss
तर ते सगळे म्हटले पेन आमच्या हातात असला तरी त्यातली शाई आम्ही विकली आहे.
आम्ही तसं लिहू शकत नाहीत.
आमचे हात अन पेन बांधलेले आहेत. 

मला या सगळ्याचा प्रचंड राग आला होता.
म्हणून एका साधू कडे गेलो.
वाटलं तेवढीच 'आत्मशांती' मिळेल.

पण मठावरचे सेवेकरी म्हटले, उद्या या.

सध्या भाऊसाहेब, PI साहेब, आमदार साहेब, पत्रकार साहेब, लेखक, कवी आले आहेत.
महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत, नंतर त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत. 

आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.

माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.
म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ ...!!

लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.
लोकं म्हटली हा यडा झालाय.
हल्ली काही बरळतो.
नंतर कळलं लोकं गुलाम झाली आहेत.
लाचार झाली आहेत.

क्षणभर वाईट वाटलं.
मी करणार तरी काय होतो.

यांच्यात सामील व्हावं की मरावं ?
की मारावं यांना ...😢😢

अचानक दचकून उठलो..
मला कसले-कसले खराब स्वप्न पडतात साला. 

हे सगळं खोटं होतं.
मला स्वप्न पडलं होतं.
माझा देश असा नाही.
माझ्या देशातले लोकं अजिबात अशी नाहीत.

कदाचित हे पाकिस्थान वगैरे सारख्या घाणेरड्या देशातील चित्र असेल.

- मी एक मतदार चांगदेव गिते 
(या देशाचा मालक)